राजगृह एक ज्ञानकेंद्र.
                 *राजगृह*


              संविधान निर्माता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी  जानेवारी 1934 मध्ये , बॅन्केचे कर्ज काढून, दादरच्या हिंदू काॅलनी मध्ये  *राजगृह* बांधले होते. त्याठिकाणी ते सहकुटुंब रहायला आले. त्यांनी आपली लायब्ररी परेलच्या दामोदर हाॅलमधून हलवून राजगृहात आणली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लायब्ररीचे  वेगवेगळे
खास विभाग केले होते. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्रे व आत्मचरित्रे, परदेश नीती, बालशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, युद्ध, राज्यघटना, चलन, मानववंशशास्त्र असे वेगवेगळे विभाग बनविण्यात आले होते. शिवाय विविध अहवाल, नियतकालिके, वृत्तपत्रे इत्यादि साठी स्वतंत्र व खास विभाग लायब्ररी मध्ये करण्यात आले होते. निरनिराळ्या एन्सायक्लोपीडीयांना तर त्यात दर्जेदार स्थान होते. शेल्फवर त्या त्या विषयांची नावे वळणदार अक्षरांनी लिहून चिकटवून ठेवण्यात आली होती.

*खास अभ्यासाची सोय*
    पहिल्या माळ्यावरील तीन ते चार ठिकाणी टेबल-खूर्च्यांची सोय करण्यात आलेली होती. प्रत्येक विषयाच्या शेल्फ मध्ये ज्या त्या ग्रंथात संबंधित ग्रंथाच्या लेखकाच्या नावाची दोन दोन कार्डे ठेवण्यात आली होती. अनेक टोकदार पेन्सिली व फाउंटन पेन्स टेबल स्टॅन्डवर असत. त्याचप्रमाणे विजेच्या दिव्याचे स्टॅन्डही असत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी  वाचलेल्या पुस्तका मध्ये टिपणे काढून ठेवत. ही टिपणे वेगवेगळ्या प्रकारची असत.
  लायब्ररीच्या मध्यभागी सोफा होता. जेव्हा बाबासाहेब थकून गेलेले असत त्यावेळी ते या सोफ्याचा उपयोग करीत. लायब्ररीच्या शेल्फच्या सभोवार काही ठळक ठिकाणी छोटे छोटे बोर्ड लावलेले होते. ते अर्थपूर्ण विचारांनी भरलेले बोर्ड होते. शिवाय मध्यभागी असलेल्या प्रशस्त हाॅल मध्ये मोठाली अशी निसर्गरम्य चित्रे लाविण्यात आली होती. ही सर्व रचना
फक्त पहिल्या माळ्यावर करण्यात आली होती. पहिल्या माळ्याचा प्रवेशाचा दरवाजा सरकत्या व मजबूत अशा पोलादी टणक पटट्यांचा होता.
जिन्याजवळ बाबासाहेबांनी इंग्रजी भाषेतून वेगवेगळे बोर्ड लावले होते. त्याचे मराठी भाषांतर असे  --
 _भारताला महान बनावयाचे असेल तर._ ...
_शब्दात शहाणपण विचारात श्रद्धा कृतीत निश्चय असेल तर भारत महान बनू शकेल._

 *25, 000 हून अधिक ग्रंथ*
    शेजारच्या खोल्या मध्ये, त्याचप्रमाणे मध्यवर्ती हाॅलच्या सभोवार,  निरनिराळ्या ग्रंथाच्या शेल्फ बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कलात्मक रितीने ठेवलेले होते. या शेल्फची विषयवार विभागणी करण्यात आलेली असून त्या विषयाचे नाव असलेली ठळक व वळणदार अक्षरांची पट्टी शेल्फवर लटकविलेली होती.


*अभ्यासलेल्या ग्रंथांचा परिचय*

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते पुस्तक कोणत्या शेल्फ
मध्ये आहे ते त्यांना तोंडपाठ असे.
एवढेच नव्हे तर,  कोणत्या ग्रंथाचा रंग कसला आहे, ते किती जाड आहे व कोणत्या पानावर त्यांना हवा असणारा मजकूर आहे इतका तपशील देखील ते सांगू शकत असत.

 *राजगृहातील लायब्ररीतील बोर्ड*
# __जर तूला मनुष्य_ _बनायचे असेल तर....."_
# _स्वतःच स्वतःशी कठोर शिस्तीने वागले पाहिजे.  "_
# _सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा व असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा._
#  _धर्म मनुष्याकरता आहे,  मनुष्य धर्माकरता नाही._ 

 *व्यायाम*
*शारीरिक व मानसिक*

बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहा मध्ये व्यायाम करण्याची साधनेही ठेवलेली होती. जोर काढण्यासाठी लाकडी ठोकळे, हाताने दाबावयाची स्प्रिंग, दंड, बैठका इत्यादींच्या व्यायामासाठी लागणारी साधने त्यांच्याकडे होती. आसने सुद्धा ते करीत असत. शारीरिक आरोग्य व बौद्धिक आरोग्य या दोन्हींची ते काळजी घेत. एका बाजूला औषधे ठेवलेली होती.

 *एक नूर आदमी दस नूर कपडा*
 ज्ञानार्जनाबरोबर त्यांच्या आवडीची दुसरी गोष्ट म्हणजे कपडे.
त्यांना निटनेटका पोशाख आवडत असे. सर्वांना ते सांगत असत कि, पोशाख नीटनेटका ठेवावा. त्याचे महत्व पटवून देताना ते म्हणत,  एक नूर आदमी दस नूर कपडा  !

 *विद्येचे पाॅवर हाऊस*
डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लायब्ररीस एखाद्या पाॅवर हाऊसचे स्वरुप आणले होते.  जगातील अस्सल ज्ञानभांडार त्यांनी  ' राजगृहात  '  मोठ्या काळजीने संग्रहित केले होते. जगात जेवढे लहान मोठे पुढारी वा राज्यकर्ते होऊन गेले त्या सर्वांची चरित्रे वा आत्मचरित्रे त्यांनी राजगृहात ठेवली होती.
             
*राजगृहातील शक्ती*
पंडीत मदनमोहन मालवीय यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची
लायब्ररी पाहिली. आणि ते आश्चर्य चकित झाले.
 त्यांनी ती लायब्ररी कित्येक लाख रुपयांना मागितली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  नकार देताना म्हणाले, ' तुम्ही तर माझी शक्तीच विकत मागत आहात, ती मी कशी देईन  ?

 *राजगृह आणि धम्मक्रांती*

असे राजगृह 1934 मध्ये बांधले गेले व त्याचे नाव ठेवले गेले.त्यावेळी कोणाला माहित होते कि नाही कोण जाणे की, 
' राजगृह ' भगवान बुद्धाच्या जीवनयात्रेतील एक महत्वाचे
धम्म-स्थळ होते.

 *असे आहे राजगृह*
येथूनच  चळवळीचे प्रकाशझोत फेकले गेले. येथूनच निरनिराळ्या विचारप्रक्षोभक ग्रंथांच्या तोफा डागल्या गेल्या.
येथूनच विरोधकांची दाणादाण उडवली जात होती. येथूनच
कनिष्ठ वर्गांना दिड हजार वर्षात कधी न मिळालेला दिलासा मिळत होता.येथूनच स्वाभिमानी चळवळीचे  दीप प्रज्वलन केले जात होते.  येथूनच पराजित लोकांचे हिरावून घेतलेले हक्क परत जिंकून घेण्याच्या नौबती झडत होत्या.
आणि....
येथेच  बाबासाहेबांना ठार करण्याची धमकी देणारी रक्ताने लिहिलेली पत्रे येत होती.

अशा राजगृहावर काल झालेला हल्ला भेकड हल्ला होता.
ज्ञानसूर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ' राजगृहा  ' वरील हल्ला बुद्धाच्या समतेवर, स्वातंत्र्यावर कलेला भ्याड हल्ला होता. 
या हल्ल्याचा जाहिर निषेध !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या