अण्णा भाऊ साठे एक समाज सुधारक💐


 
*थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन*


            तुकाराम भाऊराव साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून ते नावारूपाला आले. आण्णाभाऊ साठे हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते.आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांच्या काही गाजलेल्या कादंबर्या वैजंता ( 1961 )टिळा लाविते मी रक्ताचा, ( 1959 )डोंगरची मैना( 1959 ) माकडीचा माळ ,मुरळी मल्हारी रायाची( 1959 ) चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, (1970 )अशी ही सातार्‍याची तर्‍हा (1974 )अलगुज आणि फकिरा ( 1958  ) चौथी पर्यंत शिक्षण  असुनही, आण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील लोकवांग्मय, कथा, लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या , वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊ साठे यांना जाते.सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्यप्रकाराचा उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,गोवामुक्ती संग्राम असो या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले
 " माझी मैना गावाकडे राहिली,
 माझ्या जीवाची होतीया काहिली"
ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती.

            आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियन भाषेतून भाषांतर करून ,पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले. रशियन राष्ट्राध्यक्षा कडून त्यांचा सन्मान देखील झाला. आण्णाभाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथासंग्रह 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या.त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट ही काढले गेले."फकीरा" कादंबरीला स. 1961 मधे राज्यशासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतुक केले.कोळसेवाला, घरगडी ,खानकामगार, डोअर किपर ,हमाल, रंग कामगार ,मजूर, तमाशातला सोंगाड्या, अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्यक जिवनात वठविल्या.आण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर ( मुंबई ) झोपडपट्टीत काढले .याच झोपडपट्टीत आण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती झाली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडेवाघडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी  होणारी ससेहोलपट,अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा ही त्यांनी अनुभवला.स.1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली येऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले .
            आण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमर शेख समवेत त्यांनी काम केले. आण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सुक्ष्म होती.नाट्यमयता त्यांच्या लेखनशैलीचा आगळावेगळा भाग होता. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून आण्णाभाऊनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवला .आण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेला. दारिद्र आणि एकाएकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्य प्रतिष्ठाना कडून त्यांची उपेक्षाच झाली .अत्यंत वाईट अवस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये त्यांचे निधन झाले.
           अनेक विद्यापीठातून आण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या वर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली. हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याची अक्षरशः पारायणे केली. त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले सर्व सामान्य माणसाविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालत असे.
           मुंबई नगरी ग बडी बाका l जशी रावणाची दुसरी लंका ll
  वाजतो ग  डंका l
      डंका चहूमूलकी ll
   या शब्दात पठ्ठे बापूराव मुंबई मायानगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना आण्णाभाऊ लिहितात-
"मुंबईत उंचावरी l
   मलबार हिल इंद्रपुरीll
  कुबेराची वस्ती तिथ ,सुख भोगती ll परळात राहणारे l रात दिवस राबणारे
  मिळेल ते खाऊन घाम गाळती ll
   पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भश्रीमंत दिसते, तर आण्णाभाऊंना तीच मुंबई विषय व्यवस्थेचे प्रतीक वाटते. आण्णा भाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे' अशी आण्णाभाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती.
    ' जग बदल घालुनी घाव l
    अस सांगून गेले मला भीमराव ll
     असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती.आण्णाभाऊ साठे यांचे सारेच
  लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटीतटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे होते.
          18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आण्णाभाऊ साठे त्यांचा मृत्यू झाला.
       🙏अशा या थोर साहित्यिकाला,बिनीच्या शिलेदाराला   स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या