आत्महत्या ने प्रश्न सुटत नाही.....?


*हरलो म्हणून मरण्यापेक्षा जिंकण्यासाठी का जगू नये?*


                   मतभेद, वादविवाद, समज-गैरसमज, छोटा – मोठा, मान – अपमान, चांगला- वाईट, यश – अपयश या गोष्टींना काही लोक आयुष्यात एवढे महत्त्व देतात की, थेट जीवनच संपवायला निघतात. त्यासाठी आत्महत्येचे वेगवेगळे मार्ग निवडतात. अशी माणसं स्वतःचे जीवन कायमचे संपवतातच, मात्र मरताना इतरांनाही ” टेन्शन” देऊन जातात.काही महाभाग मरण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जातात. त्यात कुटूंबातील लोकांना काळजीयुक्त सल्ले दिलेले असतात. “याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या, सुखाने रहा,” अशी माया दाटून येणारी भाषा वापरलेली असते.

काही जण मरतांना कोणाला तरी दोष देऊन जातात. चिठ्ठीत कोणाची तरी नावे लिहून जातात. मान्य आहे, कधी – कधी अपयशाने धक्का बसतो. अन्याय  सहन होत नाही.माणूस हतबल होतो, कोणताच मार्ग सापडत नाही. जिवन नकोसं वाटू लागते. पण म्हणून त्यासाठी मरणालाच कवटाळले पाहिजे, असे थोडेच आहे. हरलो म्हणून मरण्यापेक्षा जिंकण्यासाठी का जगू नये?

म्रुत्यूला सामोरे जाताना अशी माणसे नेमका कोणता आदर्श जगासमोर ठेवून जातात?मनुष्य जन्म एवढा मातीमोल आहे का? आपल्या सोन्यासारख्या देहाची आपल्याच हाताने माती करुन घेण्यात कोणता आला पुरुषार्थ ? ज्यांना आयुष्याची किंमतच कळाली नाही, त्यांनी मरतांना केलेल्या उपदेशाला काय अर्थ आहे? स्वतःच्या हाताने आयुष्याची राखरांगोळी करून घ्यायची आणि आपल्या म्रुत्यूनंतर जगाने हळहळ व्यक्त करावी, हा विरोधाभास नव्हे का? काही जणांच्या म्रुत्यूचे तर कारणच उजेडात येत नाही.आत्महत्या का केली याचा उलगडा कधीच होत नाही. असा आत्महत्या करून ओढवून घेतलेला म्रुत्यू कोणत्या अर्थाने स्मरणात ठेवणारा ठरतो?कुटूंबातील एखादी व्यक्ती आत्महत्या करून अचानक कायमची निघून जाते, तेव्हा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मोठा मानसिक धक्का बसतो, ही गोष्ट खरी आहे.

मात्र आपल्या निर्णयामुळे कोणालातरी आपण फार मोठे दुःख देऊन जात आहोत, याचा विचार ज्यांनी केलेला नसतो, त्यांच्यासाठी विचार करत राहण्यात काय फायदा? ज्यांना आयुष्याची किमतच कळाली नाही, त्यांच्या आठवणी टिकून राहण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत राहतात.आत्महत्या करून चुकीचा संदेश देणार्यांचा स्मृतीदिन साजरा केला जातो. त्याच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबविले जातात. वास्तुंना नाव दिली जातात.

जिवंत राहून काहीतरी चांगले काम करणे ज्यांना शक्य झाले नाही, त्यांच्या नावाने अवडंबर मांडायचे कशासाठी? जगण्यात जी मजा आहे, ती अशी आत्महत्या करून मेल्याने कशी काय मिळू शकते? म्हणून परिस्थिती कशीही असो,  ज्याने मरण्यापेक्षा धैर्याने जगून दाखविले तोच खरा माणूस. मी जगेन आणि इतरांनाही जगण्याची प्रेरणा देत राहील, असा विचार ज्याला करता आला तो खरा माणूस!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या